योगी सर्वकाळ सुखदाता
|अक्षरभारती | Class 10 |
- प्रियंका चंद्रात्रे
जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी ।
जीवन जैसे कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ।।
जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।
उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ।।
उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती ।
योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाही ।।
उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां ।
योगियांचे गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ।।
मेघमुखें अध:पतन । उदकाचें देखोनि जाण ।
अध:पातें निवती जन । अन्नदान सकळांसी ।।
तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।।
- संत एकनाथ
Read More : अंकिला मी दास तुझा
भावार्थ
- ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगात
संत श्री एकनाथ यांनी योगी पुरुषाची महानता अत्यंत समर्पक शब्दांत दाखवली आहे.
- चकोर पक्ष्यासाठी चंद्रकिरण हे त्यांचे जीवन असते. चंद्राची किरणे पिऊन तो जगतो अशी कल्पना आहे. तसेच पक्षिणी आपल्या लहान पिल्लांना पंखाखाली घेते, त्यांना मायेची ऊब देते. पिल्लांना पक्षिणीचे पंख सुरक्षित ठेवतात. पाणी हे पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन असते. पाण्याशिवाय सजीवांचे जीवन अशक्य आहे. त्याचप्रमाणे योग्यांचे स्थान समाजात असते. ते अत्यंत मृदू, प्रेमळ असतात. सर्वांशी त्यांचे वागणे प्रेमाचे आणि मृदू असते. असा हा योगी पुरुष आपल्या विचारांच्या ज्ञानाच्या पंखाखाली आपणा सर्वांना एकत्र आणतो आणि आपले जीवन सुख समाधानाने भरून टाकतो.
- योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ कसा आहे, हे सांगताना एकनाथ महाराज पुढे सांगतात की, पाण्याने शरीरावरील मळ धुतला जातो. पाण्याने शरीर वरवर धुतले जाते. कालांतराने शरीर पुन्हा अशुद्ध होते. परंतु योगी पुरुषाच्या सहवासाने शरीर व मनाचीही शुद्धी होते. माणसांतील वाईट विचारांचा नाश होऊन अंतर्बाहय मन निर्मळ होते. पाण्याने होणारी शुद्धी ही क्षणिक, एकावेळेपर्यंत मर्यादित असते. पंरतु, योगी सर्वकाळ सुखदायक असतो. योगी लोकांना शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेची शिकवण देऊन त्यांचे आयुष्य कायमस्वरूपी उजळून टाकतो. त्याच्या सान्निध्यात प्रत्येकाला सुख प्राप्त होते.
- पाण्याने मिळणारे सुख हे क्षणिक व मर्यादित आहे. खूप तहानलेल्या माणसाला पाणी प्यायल्याने क्षणभर लगेच समाधान मिळते; पण पुन्हा काही वेळाने तहान लागते. पाण्याने मिळणारी तृप्ती ही क्षणिक असते. परंतु योगी पुरुषांच्या सान्निध्याने स्वानंदतृप्ती लाभते. मनाला एक कायमस्वरूपी सुख समाधान मिळते. जे सुख कमी होत नाही किंवा संपतही नाही असे सुख माणसाला प्राप्त होते. म्हणजेच सुखाला, आनंदाला कसलीच विकृती राहत नाही. याच स्वानंदतृप्तीसाठी प्रत्येकजण धडपडत असतो. योगी पुरुषाच्या सहवासामुळे ही तृप्ती आपणास सहज प्राप्त होते.
- पाण्याचा गोडवा केवळ जिभेलाच कळतो. तो जिभेपुरताच मर्यादित असतो. परंतु योग्याच्या सहवासाने लाभलेले माधुर्य मनुष्याच्या सर्वच इंद्रियांना संतुष्ट करते. मनातील कटुता नष्ट होऊन मनाला एक आंतरिक समाधान लाभते. ते चिरकाळ टिकणारे असते.
- आकाशातील काळ्या ढगांमधून पाण्याच्या धारा धरतीवर बरसतात. त्यामुळे सर्व लोकांना खूप आनंद होतो. सगळे लोक समाधानी होतात. कारण या मेघांतून कोसळणाऱ्या पाण्यामुळे धरतीवर हिरवळ पसरते. त्यातून अन्नधान्याची निर्मिती होते. खायला अन्न व प्यायला पोटभर पाणी मिळाल्याने लोक सुखी–समाधानी होतात.
- मेघमुखातून धरतीवर येणारे पाणी जसे अन्नधान्याची निर्मिती करून लोकांना सुखी करते. त्याचप्रमाणे योगी पुरुषसुद्धा या इहलोकी जन्म घेतात. स्वर्गलोकातून ते जणू खाली येतात म्हणजेच धरतीवर जन्म घेतात आणि आत्मज्ञान देऊन सामान्य लोकांचा उद्धार करतात, त्यांचे कल्याण करतात. आपल्या भजन कीर्तनातून ज्ञान देऊन ते सर्व लोकांना सदैव सुखी–समाधानी करतात.
Visit our YouTube Channel : Chandratre's Edu Hub
