अंकिला मी दास तुझा
|अक्षरभारती | Class १० |
- प्रियंका चंद्रात्रे
अग्निमाजि पडे बाळू ।
माता धांवें कनवाळू ।।१।।
तैसा धांवें माझिया काजा ।
अंकिला मी दास तुझा ।।२।।
सवेंचि झेंपावें पक्षिणी ।
पिलीं पडतांचि धरणीं ।।३।।
भुकेलें वत्सरावें ।
धेनु हुंबरत धांवे ।।४।।
वणवा लागलासे वनीं ।
पाडस चिंतीत हरणी ।।५।।
नामा म्हणे मेघा जैसा ।
विनवितो चातक तैसा ।।६।।
- वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज परमेश्वराचा (विठ्ठलाचा) धावा करतात.
- नामदेवांनी विविध उदाहरणांतून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. मी सर्वस्वी तुझ्या अंकित झालो आहे.
- ज्याप्रमाणे नजरचुकीने अग्नीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकूळ होऊन, काळजीने त्याच्याजवळ धावून जाते. त्याला मायेने, प्रेमाने उचलून घेते. त्याचप्रमाणे हे प्रभू, विठ्ठला, मी पूर्णपणे तुझा अंकित आहे. मी तुझा दास, सेवक आहे. आईप्रमाणे तुही माझ्या अडचणीत, माझ्या कार्यात धावत ये.
- झाडावरील घरट्यात असणारे पक्ष्याचे लहान पिल्लू घरट्यातून बाहेर येऊन उडण्याच्या प्रयत्नात खाली जमिनीवर पडताच त्याची आई पक्षिणी आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने तत्परतेने झेप घेते. त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी धडपडते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तुझ्या या सेवकासाठी तू असाच धावून ये.
- भूकेने व्याकूळ झालेले वासरू गोठ्यात ओरडत असते. त्याची ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्याने हंबरत आपल्या वासराच्या ओढीने त्याच्याजवळ धावत येते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला तूही माझ्यासाठी धावून ये.
- जंगलात वणवा पसरलेला आहे आणि त्यात हरिणीचे पाडस अडकलेले आहे. अशावेळी त्याची आई म्हणजेच हरिणी आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी खूप चिंतीत होते. त्या पाडसासारखीच माझी अवस्था झाली आहे. म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.
- ज्या प्रमाणे चातक पक्षी आकाशात जमलेल्या काळ्या काळ्या, पाण्याने भरलेल्या ढगांना पाणी बरसवण्यासाठी विनवणी करतो. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी तुला विनवितो आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment