Advertisement

11 March 2026

व्यायामाचे महत्त्व | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |

व्यायामाचे महत्त्व 


कवी - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर 


| अक्षरभारती | Class 9 |

                                                                                                 
                                                                                                  - प्रियंका चंद्रात्रे 


व्यायामाचे महत्त्व | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |


भावार्थ 

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी मानवी जीवनातील व्यायामाचे महत्व या कवितेतून स्पष्ट केले आहे.

Visit our YouTube Channel : Chandratre's Edu Hub


व्यायाम आरोग्यदायी मित्र | हे ध्यानी ठेवावे सूत्र |

आळस वैरी मानिला सर्वत्र | सर्वतोपरी ||


व्यायाम हा आपल्याला निरोगी आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. हा नियम आपण कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण आळस हा आपल्या जीवनाचा शत्रू आहे, हे सगळ्यांनी मान्य केलेले आहे. 


व्यायामाविण सात्त्विक भोजन । तेहि मारी विकारी होऊन ।
व्यायामे होय अग्निदीपन । अन्नपचन सहजचि ।।

निरोगी आयुष्यासाठी आपण योग्य आहार घेत असतो. पण आहारासोबत व्यायामही केला पाहिजे, नाहीतर अशा आहारामुळे विविध विकार \ आजार होऊ शकतात. योग्य आहारासोबत व्यायाम केल्यामुळे पोटातील जठराग्नि उत्तेजित होतो. त्यामुळे अन्नाचे पचन सहज होते.


व्यायामे जडत्व जाई दूरी। व्यायामे अंगी राहे तरतरी ।
रक्तव्यवस्था उत्तम शरीरी। वाढे विचारी सजीवपण ।।

रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केला नाहीतर शरीरातील जडत्व \ स्थूलपणा वाढत जातो. रोज व्यायाम केल्यामुळे स्थूलपणा कमी होऊन शरीर सुडौल होते. व्यायामामुळे शरीरातील रक्तव्यवस्था सुरळीत होते. रक्तप्रवाह व्यवस्थित झाल्यामुळे रक्ताशी संबंधित आजार होत नाही आणि आपले आयुष्य वाढते.


व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामे मानव होय दीर्घायु ।
व्यायामहीना पित्त, कफ, वायु । जर्जर करिती अत्यंत ।।

रोज व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरातील स्नायू बळकट होतात. सशक्त स्नायूंमुळे माणूस आजारी पडत नाही आणि आयुष्य वाढते. आपण व्यायाम केला नाही तर, आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ ( शरीरातील तीन प्रमुख दोष आहेत, जे आरोग्य आणि शरीराची प्रकृती नियंत्रित करतात) यांचे प्रमाण कमी-जास्त होऊ लागते आणि आपण आजारी पडतो.



व्यायामे वाढे प्रतिकार शक्ति । स्वावलंबनाची प्रवृत्ति ।
व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति । कार्य करण्याची ।।

व्यायामामुळे आपले शरीर मजबूत होऊन रोगप्रतिकारक्षमता वाढते. त्यामुळे आपले शरीर आजारांचा सामना करू शकते. त्याचबरोबर उत्तम प्रकृति असल्यामुळे आपण स्वावलंबी बनतो. कोणतेही काम करायचे असल्यास कोणावर अवलंबून न राहता सक्षमपणे पूर्ण करण्याची शक्ती येते. व्यायामामुळे शरीरात एक वेगळीच ऊर्जा येत असते. कोणत्याही कामामध्ये उत्साह राहतो.  









10 March 2026

Tifan | तिफन | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |

तिफन 

कवी - विठ्ठल वाघ 


 | अक्षरभारती | Class 9 |

                                       - प्रियंका चंद्रात्रे 

Tifan | तिफन | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |




भावार्थ 

  कवी ' विठ्ठल वाघ ' यांनी पेरणी, बैलांविषयीचे प्रेम, पावसाच्या दिवसांतील मातीचा सुगंध, शेतकऱ्यांचे स्वप्न, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेतीकामाची धावपळ याचे वर्णन या कवितेत केले आहे. 
तिफन हे शेतीमध्ये पेरणीसाठी वापरले जाणारे पारंपारिक अवजार आहे. याला तीन फणा 
 ( लोखंडी टोक ) असतात, ज्यामुळे एकाच वेळी तीन ओळीत बियाणे पेरले जाते. बैलाच्या साहाय्याने चालवल्या जाणाऱ्या या अवजाराचा उपयोग जमिनीवर सारी पाडून, बियाणे योग्य खोलीत पेरून ते मातीने झाकण्यासाठी केला जातो.  

Visit our YouTube channel : Chandratre's Edu Hub


काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते 
ईज नाचते थयथय ढग ढोल वाजवते 

काळ्याभोर मातीत तिफन चालत आहे. आकाशात विजा चमकत आहे जणू काही त्या थयथय नाचत आहे आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे जणू काही ढग ढोल वाजवत आहेत.



नंदी बैलाच्या जोळीले सदाशीव हकालते 
वटी बांधून पोटाले पाराबती उनारते 
वटी पोटाले बांधते झोयी काटीले टांगते 
झोयी काटीले टांगते त्यात तानुलं लळते 
त्यात तानुलं लळते ढग बरसते 

सदाशीव म्हणजे शेतकरी शेतामध्ये नंदीबैलाच्या जोडीला तिफन बांधून हाकारत आहे. त्यावेळी सदाशिवाची पत्नी पार्वती ( पाराबती ) आपल्या पोटाला पदराची ओटी बांधून त्यात बियाणे घेऊन पेरणी करत आहे. पार्वतीने आपले तान्हुले बाळ झोळीत ठेवले आहे आणि ती झोळी झाडाच्या फांदीला बांधून ठेवली आहे. बाळ झोळीत रडत आहे आणि त्याच वेळी पाऊस सुरू झाला आहे. 


काकरात बिजवाई जसं हासरं चांदनं 
धरतीच्या आंगोपांगी लाळानौसाचं गोंदनं 
सरीवरी सारी येती माती न्हातीधुती होते 
तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते 
भूल जीवाले पाळते वाट सांजीले पाहेते 
मैना वाटुली पाहेते राघू तिफन हानते 
राघू तिफन हानते ढग बरसते 

काकरात बिजवाई म्हणजे काळ्या मातीत पेरलेले बी\ धान्य जणू हसणारं चांदणं वाटत आहे. पेरलेले ते धान्य पाहून असे वाटते जणू धरतीच्या अंगावर लाडाने नवसाचे गोंदनच काढले आहे. सगळीकडे पावसाच्या सरीवर सरी बरसत आहेत. जणू काही त्या मातीला न्हाऊ घालत आहेत. माती ओलीचिंब होऊन तिचा कस्तुरीसारखा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. या मातीचा सुगंध मनाला मोहित करत आहे. तिकडे संध्याकाळच्या वेळी मैना ( शेतकऱ्याची बायको ) घरी आपल्या राघूची ( शेतकऱ्याची ) वाट पाहते. मात्र शेतकरी शेतात तिफन चालवत आहे. पाऊस पडत आहे.



वला टाकती तिफन शितू वखर पाहेते 
पानी भिजलं ढेकूल लोनी पायाले वाटते 
काया ढेकलात डोया हीर्व सपन पाहेते 
डोया सपन पाहेते काटा पायात रुतते 
काटा पायात रुतते लाल रगत सांडते हीर्व सपन फुलते
 हीर्व सपन फुलते ढग बरसते 


तिफन बियाण्याच्या ओळी ताकत पुढे जात आहे. मागून एक मदतनीस ( शितू ) वखराने ( अवजाराने ) ते बी मातीत ढकलत आहे. पावसाच्या पाण्याने भिजलेले मातीचे ढेकूळ पायाला लोण्याप्रमाणे मऊ लागत आहे. या काळ्या ढेकळात आपल्या कष्टाने, मेहनतीने हे शेत हिरवेगार होईल, शेतात धान्य डोलू लागेल असे स्वप्न डोळयांनी पाहत असताना शेतकऱ्याच्या पायात काटा रुततो. काटा रुतल्यामुळे पायातून रक्त येऊ लागते. पण शेतकऱ्याला त्या वेदना जाणवत नाही. कारण त्याने केलेल्या कष्टामुळे, मेहनतीमुळे हिरवेगार शेत होणार आहे असा त्याला विश्वास आहे. पाऊस पडत आहे. 










08 March 2026

पुन्हा एकदा | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ | Punha Ekda poem |

 पुन्हा एकदा 


कवयित्री - प्रतिमा इंगोले 


 | अक्षरभारती | | Class 9 | 

                               - प्रियंका चंद्रात्रे 


पुन्हा एकदा | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |



पुन्हा एकदा 
चमकावी वीज 
उतरावी खाली 
भिनवी रक्तात 
पेटवे स्नायू 
करीत पुकार 
पुन्हा एकवार 

कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी निसर्गातील वेगवेगळ्या प्रतिकांचा वापर करून नवीन समाज करण्याचा ध्यास घेतलेल्या मनस्थितीचे वर्णन केले आहे. त्या म्हणतात की, पुन्हा एकदा वीज चमकून खाली यावी. त्या विजेचे तेज, तिची ऊर्जा , प्रखरता माणसांच्या रक्तात भिनावी. म्हणजेच माणसांमध्ये पुन्हा एकदा उत्साह, जोश भरून यावा. त्यांचे स्नायू पेटून उठावेत म्हणजेच समाजात असलेल्या जुन्या, रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार, अनिष्ट चालीरीती याविरुद्ध त्यांनी पेटून उठावे, त्यांचा विरोध करावा आणि हे सारे नष्ट करून समाजाला प्रगतीच्या वाटचालीवर नेणारे नवीन विचार निर्माण व्हावेत. 


पुन्हा एकदा | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |





Visit our YouTube channel : Chandratre's Edu Hub

पुन्हा एकदा
घालीत पिंगा
पावसाच्या सरी
व्हाव्यात बेभान
कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक...
पुसून टाकीत भेदाभेद...
पुन्हा एकवेळ...


कवयित्री पुढे म्हणतात की, पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरी पिंगा घालीत म्हणजे स्वत:भोवती गोल गोल फिरत, स्वत:चे भान विसरून जमिनीवर याव्यात. या बेभान सरींमुळे मातीत माती एक व्हावी म्हणजे समाजातील भेदभाव नष्ट होवून सगळ्यांनी एकत्र यावं. समाजात असलेला गरीब-श्रीमंत, उच्च-नीच , जात- धर्म, स्त्री- पुरुष यांच्यात होणारा भेदभाव संपावा आणि नव्या समाजाची निर्मिती व्हावी ज्यात भेदभाव केला जाणार नाही.

पुन्हा एकदा
घुमावा वारा
युवक इथला
भारला जावा भुलावी
तहान विसरावी भूक
नवनिर्माणाची लागावी
चाहूल उजळावी भूमी... दिगंतात...
पुन्हा एकदा...


कवयित्री म्हणतात की, पुन्हा एकदा नवनिर्मितीचा वारा आपल्या समाजात घुमावा. या वाऱ्याने प्रत्येक युवक भारून जावा. त्याने स्वत: ची तहान भूक विसरून नव निर्माणाचा ध्यास घ्यावा. नवनिर्माणाची चाहूल लागावी. नवीन विचारांचा नवा समाज निर्माण व्हावा. नव्या विचारांनी, नव्या कर्तुत्वाने आपली सारी भूमी उजळून निघावी. म्हणजेच आपली भारतभूमी पुन्हा एकदा नव विचारांना घेऊन पुढे जावी आणि तिची कीर्ती जगभर पसरावी, असे कवयित्रीला वाटते.

















04 March 2026

उजाड उघडे माळरानही | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |

उजाड उघडे माळरानही

कवयित्री - ललिता गादगे 


 | अक्षरभारती | Class 9 |

                                                
                                                                            - प्रियंका चंद्रात्रे 


उजाड उघडे माळरानही | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |


कवितेचा भावार्थ 

स्वागत करण्या वसंत ऋतूचे
रंग उधळले दिशा-दिशांना,
बेरड कोरड इथली सृष्टी
घेऊन आली ती नजराणा ।।१।।

🌲वसंत ऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, 🍀फुले  🌻🌺 फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली आहे. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघाल्या आहेत. शिशिर ऋतूमध्ये सारी सृष्टी कोरडी, रुक्ष झालेली असते. अशी ही कोरडी, रुक्ष झालेली सृष्टी असा वेगवेगळ्या रंगाचा नजराणा वसंत ऋतूसाठी घेऊन आली आहे.

Visit our YouTube channel : Chandratre's Edu Hub

गर्द पोपटी लेऊन वसने
मुरडत आली लिंबोणी,
जर्द तांबडी कर्णफुलेही
घालून सजली नागफणी ।।२।।

वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी हिरवी 🌿पालवी फुटते, त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे. गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे देखील सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद 😊पसरलेला आहे.

उजाड उघडे माळरानही | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |


लुसलुस पाने अंगोपांगी
झुले वड हा दंग होऊनी,
दुरंगी चुनरीत उभी ही
घाणेरी ही नटुनी थटुनी ।।३।।

वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी🍀 फुटते अशीच ही मऊ, कोवळी, लुसलुशीत पाने अंगोपांगी घेऊन वडाचे झाड दंग होऊन अतिशय आनंदाने डुलत आहे. एवढेच नव्हे तर घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे.


सळसळ झळझळ पिंपळ पाने
मऊ मुलायम मोरपिसापरी,
सांबर लाल कळ्यांनी लखडून
उभे स्वागता पाणंदीवरी ।।४।।

वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळ आपल्या मोरपिसाप्रमाणे🦚 मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभा आहे. तसेच सांबर वृक्ष देखील रानाच्या त्या चिंचोळ्या वाटेवर (पाणंद) दोन्ही बाजूला लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभे आहेत.

पळसफुले ही बहरून आली
या मातीच्या अंकावरती,
कुसुमे सारी या जगातली
पाहून त्यांना मनात झुरती ।।५।।

पळसांच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या 🙏स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. त्यांचे ते मनमोहक रूप पाहून जगातील इतर सर्व फुले त्यांच्या सौंदर्यापुढे मनातल्या मनात मत्सर करत आहेत (झुरत आहेत).


आंब्याच्या मोहरातून आली
कोकिळेची सुरेल तान,
उजाड उघडे माळरानही
गाऊ लागले वसंतगान ।।६।।

वसंत ऋतूत सृष्टीत अनेक बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या 🥭झाडाला मोहर येतो. अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा🐦‍⬛ सुरेल तान घेत असते. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही फुलांनी पानांनी बहरून आलेले आहे. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत गात आहे.









03 March 2026

जी. आय. पी. रेल्वे | | अक्षरभारती | Class 9 | पाठ सारांश |


जी. आय. पी. रेल्वे

 | अक्षरभारती | Class 9 |

                            
                                                                                 - प्रियंका चंद्रात्रे 

पाठ सारांश 



जी. आय. पी. रेल्वे | Class 9 |


👉 या पाठाचे लेखक केशव सीताराम ठाकरे आहेत. सन १८५३ मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वेमार्ग तयार केला. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना वाटणारे नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास याचे लेखकाने सुंदर वर्णन केले आहे. 



जी. आय. पी. रेल्वे | Class 9 |




Visit our YouTube Channel : Chandratre's Edu Hub

👉 मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांनी केला. मूळजी जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेविड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेट जी यांचेही पाठबळ होते. 

👉 दिनांक १८ एप्रिल सन १८५३, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. 

👉 आगगाडीला पाना- फुलांचे हार, तोरणे, निशाणे लावून १० मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले होते. इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशाण फडकत आहे. 


👉 डब्यांत गादीच्या खुर्च्या, कोच यांवर रेल्वेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेटजी जीजीभाई, नाना शंकरशेठ  आणि अनेक इतर नगरशेट जामानिमा ( पारंपारिक पोशाक ) घालून बसले होते. 

👉 पाच वाजेच्या मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप पोहोचली. 

👉 वाफेच्या गाडीत बसायची लोकांची हिम्मत होत नव्हती, म्हणून दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या- आणण्याची दवंडी पिटवण्यात आली. 

👉 वाफेची गाडी ही इंग्रजांची विलायती भुताटकी आहे, असा लोकांचा समज होता. 


👉 एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले. त्यांनी आपले अनुभव सांगितले पण लोकांच्या मनातील भीती जात नव्हती. 

 👉 प्रत्येक माणसास एक रुपया इनाम आणि मोफत प्रवास. 

👉 रुपयांचे इनाम आठ आणे झाले पुढे चार आणे झाले, शेवटी लोकांचा संयम सुटला आणि गर्दी वाढू लागली. इनामे बंद झाली आणि तिकिटे चालू केली गेली. 

👉 ठाणे- मुंबई बैलगाडीच्या प्रवासाला एक दिवस लागत असे, मात्र आगगाडीने सव्वा तासात पूर्ण होत होता. 

👉 खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे- रस्ता सन १८५८ च्या फेब्रुवारीत पूर्ण झाला. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान फक्त खडकी आणि तळेगाव ही दोनच स्टेशन होती. 


👉 बोरघाटाचे काम - घाटाचे काम चालू असताना मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास करताना पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की सगळ्या प्रवाश्यांना तेथून पालख्या, डोल्या, खुर्च्या आणि बैलगाड्यांत बसवून घाटाखाली खोपोवलीला आणायचे. सगळे प्रवाशी खोपोवलीला आले की तेथे पुन्हा आगगाडीत बसून मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट-उतरणीची व्यवस्थेचा कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या व्यापाऱ्याने घेतले होते. घाट-उतरणीचे चार तास धरून, पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अठरा तासांचा होता. 








 

01 March 2026

आभाळतल्या पाऊलवाटा | अक्षरभारती | Class ९ | पाठ सारांश |

 आभाळातल्या पाऊलवाटा

| अक्षरभारती | Class ९ |

                                                                                       
                                                                                    - प्रियंका चंद्रात्रे 

पाठ सारांश 

आभाळतल्या पाऊलवाटा | class 9 |



✍️ आभाळातल्या पाऊलवाटा हा पाठ 'आपली सृष्टि आपले धन' या पुस्तकातून घेतला आहे. या पाठात पक्ष्यांचे स्थलांतर व त्यामागील कारणे यांचा उल्लेख केला आहे. 

✍️ युरोप आणि उत्तर आशियातून हजारो मैलांचा प्रवास करून बदक व इतर असंख्य जातींचे पक्षी नियमितपणे हिवाळ्याच्या आरंभी भारतात येतात. 

 Visit our YouTube channel : Chandratre's Edu Hub

✍️ श्वेतबलाक जर्मनीतून येतात, तर बदकांच्या काही जाती सायबेरियातून भारतात येतात. 

✍️ बलकांच्या स्थलांतराविषयी कालिदासाच्या वाड्मयात उल्लेख आढळतात. हंस पक्षीसुद्धा पावसाळ्यात दिसत नाहीत, अशी वर्णने प्राचीन वाड्मयात आहेत. 

✍️ युरोपमध्ये अनेक पक्षी हिवाळ्यात दिसेनासे होतात. अनेकांच्या समजुतीप्रमाणे बर्फ पडू लागण्यापूर्वी हे पक्षी बेडूक, खवलेकरी अथवा सस्तन प्राण्यांप्रमाणे चिखलात अथवा कपारीत गाडून घेऊन प्रदीर्घ हिवाळी झोप काढत असले पाहिजेत. पुढे माणूस एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले, की आपल्या खंडातून गायब होणारे पक्षी त्याच ऋतूत दुसऱ्या खंडात दिसून येतात.


✍️ पक्षांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्याची पद्धत : 
 
१ ) वाळे अडकवण्याची पद्धत -

एखाद्या विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात ॲल्यु‍मिनियम   चे बनवलेले खुणेचे वाळे अडकवून द्यायचे. या वाळ्यावर ज्या संशोधनसंस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुणेचा क्रमांक असतो. कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्ष्याला, कुठे आणि केव्हा लावले यांची संस्थेकडे नोंद असते. केरळात वाळे लावलेले पारित पक्षी काबूल, अफगाणिस्तान , वायव्य पाकिस्तान या भागांत सापडले आहेत. केरळातलाच एक रानपरीट ब्रम्हदेशात सापडला आहे. 


२) आधुनिक पद्धती -

विमाने आणि रडारयंत्रणा 

✍️ हिमालयासारख्या पर्वतरांगांमध्ये राहणारे पक्षी थंडीत खाली दरीत अथवा सखल भागात उतरतात आणि उन्हाळ्यात परत वर सरकतात. त्यांचा एकूण प्रवास काही किलोमीटरचाच असतो. 


✍️ अनेकदा दुष्काळ, महापूर अथवा बर्फवृष्टीमुळे एखाद्या प्रांतात अन्न मिळेनासे झाले, की पक्षी तो प्रांत सोडून तात्पुरते दुसरीकडे जातात.

✍️ अन्नाचे दुर्भिक्ष हीच स्थलांतरामागची  मूळ  प्रेरणा आहे. 












27 February 2026

Kulup | कुलूप | अक्षरभारती | Class 9 | Kulup lesson summery | पाठ सारांश |

कुलूप 


| अक्षरभारती | Class 9 | 

                                    - प्रियंका चंद्रात्रे 


पाठ सारांश 

✍️ लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर  यांच्या ' सुदाम्याचे पोहे ' या लेखसंग्रहातून हा पाठ घेतला आहे. पाठातील मुख्य पात्र बंडूनाना आहेत, ज्यांना कुलपे संग्रह करण्याचा छंद आहे. 

✍️ बंडूनानांनी आपला छंद पूर्ण करायचा म्हणून, घरात अनेक धातूंची, आकारांची , कळींची कुलुपे जमवून संग्रहालय बनवले आहे.

Visit our YouTube channel : Cahndratre's Edu Hub

✍️ घरात दुधाच्या कपाटापासून ते पैशांच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी कुलुपे लावलेली आहेत. घरावर डाका पडणार आहे असे कळल्यावर कोणी इतकी तयारी करत नसेल, एवढा बंदोबस्त बंडूनाना करत असे. बंदोबस्त करण्याचे कारण वस्तूंचे रक्षण व्हावे असे नसून, कुलपांचा संग्रह मित्रांना दिसावा असा आहे. या हव्यासामुळेच बंडूनानांनी काही कडयांस दोन-दोन व काही दारांस दोन्ही बाजूंनी कुलपे लावलेली आहेत. 


बंडूनानांचे व्यक्तिमत्व | कुलूप | Class ९ |


✍️बंडूनानांच्या या छंदामुळे अनेक विनोदमय आणि संकटमय प्रसंग आले ते पुढीलप्रमाणे :

१ ) धान्याच्या कोठीचे कुलूप 

एकदा धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाने हरवली. कुलूप वेगळ्या पद्धतीचे  असल्यामुळे संपूर्ण बाजारात किल्ली मिळाली नाही. कुलूप लोहाराकडून काढणे हे बंडूनानांना मान्य नव्हते कारण पोटच्या मुलापेक्षाही प्रेमाने वाढवलेल्या कुलपाची हाडे खिळखिळ होताना पाहणे हे त्यांच्यासाठी वेदनदायी होते. शिवाय बंडूनाना मानी स्वभावाचे, त्यांनी शेजाऱ्यांकडे कधी ओंजळभर धान्यही उसने मागितले नव्हते. पहिला दिवस घरातील सर्व मंडळींनी त्या कुलपानिमित्त कडकडीत उपासात काढला. दुसऱ्या दिवशी द्ववादशी होती, तोही दिवस धार्मिकपणाने उपासात काढला. शेवटी सर्व हकिगत कळताच लेखकाने स्वत: लोहारास घेऊन नानांच्या घरी गेले व ते कुलूप फोडले; पण त्यामुळे नानांना लेखकाचा इतका राग आला, की ते पंधरा दिवसापर्यंत नीटपणे बोलले नाही.


२) ' वसुधैव कुटूंबकम् ' वृत्तीचे कुलूप -  

बंडूनाना सर्व उपयोगातील किल्ल्या आपल्या जानव्यात अडकून ठेवत असे त्यामुळे त्या कधी  हरवत नसे. हरवायच्या त्या कुटुंबातील सदस्यांकडे दिलेल्या किल्या. धान्याच्या कोठीच्या कुलपाच्या प्रसंगामुळे नाना साधी बाजारातील कुलपे कुटुंबाच्या स्वाधीन करू लागले. या कुलपांना कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडी चालत असे. कधी कधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत. त्यांची अशी ' वसुधैव कुटूंबकम् ' वृत्ती ( सगळे कुलपे एकाच किल्लीने उघडणे ) पाहून शेवटी नानांच्या जवळच्या एका विश्वासू नोकराने हजार पाचशेचे डबोले घेऊन पळाला. 

३) तिजोरीची विविध कुलपे

अ ) अक्षरी कुलूप :

तिजोरीला कोणते कुलूप लावायचे याचा बंडूनानांना फार दिवस प्रश्न पडला होता. प्रथम त्यांनी अक्षरी कुलूप लावले; पण तिजोरी अंधारात असल्यामुळे कुलपाची अक्षरे जमावताना ती नीट दिसेना, म्हणून त्यांनी ती मोठया कष्टाने उजेडात आणून ठेवली. पण तेव्हापासून अक्षरे जुळवताना समोर उभ्या असलेल्या माणसास ती अक्षरे दिसू लागली. त्यामुळे ती कुलपेही निरुपयोगी होती. यापेक्षा अक्षरशत्रू  कुलपे ( अशी कुलपे, ज्यांना उघडण्यासाठी अक्षरे जुळवावी लागत नाहीत, ती फक्त साध्या किल्लीने उघडतात ) असे म्हणून नानांनी त्या कुलपाऐवजी दुसऱ्या कुलपाची योजना केली. 

ब ) अक्षरशत्रू कुलूप : 

हे कुलूप नुसते दाबले की लागत असे. उघडताना मात्र त्याला किल्लीची जरूर लागे. एके दिवशी बंडूनाना लेखकाकडे येऊन म्हणाले " आमच्या आर्यभूमीच्या ( भारताच्या ) पुत्रांना कल्पकता नाही म्हणून चोहोकडे ओरड चालू आहे. पण हा आरोप निव्वळ खोटा आहे. अहो, आम्हाला सांधी मिळत नाही साधी! ती मिळाली तर आमच्याकडे शेकडो एडिसन झाले असते" देशाच्या अभिमानाचा या  उमाळ्याचा अर्थ विचारला असता नानांनी प्रथम आपली कोणत्याही प्रकारे स्तुती करणार नाही असे लेखकाकडून वचन घेतले. हे कुलूप नानांनी स्वत: लोहाराच्या मदतीने बनवून घेतले होते. मात्र थोड्याच दिवसात चोरी झाली, तेव्हा नानांचा संताप झाला व म्हणाले " आमच्याकडे चोरसुद्धा देशबुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात.!" ( चोर देशाची प्रगती किंवा कला पाहू शकत नाही व कलेचा आदर करू शकत नाही) 

क ) घंटेचे कुलूप : 

शेवटी नानांनी तिजोरिस घंटेचे कुलूप लावले व ती आपल्या निजायच्या खोलीत नेऊन ठेवली. या कुलपास किल्लीचा प्रयोग सुरू होताच घंटा वाजायला लागेल.

४ ) टोळीकडून घेतलेली कुलपे : 

गावात लोकांची एक टोळी आली. त्यांच्याजवळ चाकू, सुऱ्या , कुलपे वगैरे बऱ्याच वस्तु विकण्यासाठी होत्या. त्यांच्याजवळची बहुतेक कुलपे बंडूनानानीच विकत घेतली व घरातील सर्व जुनी कुलपे काढून नवी कुलपे लावली. कर्मधर्मसंयोगाने  [ चांगली कृत्ये  (कर्म ) आणि योग्य समय (धर्म \ नशीब ) यांच्या योगायोगाने जुळून आलेला मिलाफ ] एक नाटकमंडळीही  याच सुमारास गावात आलेली होती. तिचा पहिला प्रयोग 'सुभद्राहरण अथवा चौर्यविपाक ' त्याच दिवशी होता. बंडूनाना कुटूंबातील सर्व सदस्यांना घेऊन नाटकाला गेले. नाटक सकाळी पाच वाजता संपले. घरी येऊन पाहतात तो सर्व पेट्यांची कुलपे जशीच्या तशी असून आतील माल चोरीस गेलेला! तपास केला असता कळाले की टोळीही पळाली होती. यावरून लक्षात आले की, या टोळीने नानांना सर्व कुलपे विकून स्वत:च्याच किल्ल्या लावून माल पळवला. सुदैवाने त्या रात्री बंडूनानांचे कुटुंब त्यांचे न ऐकता आपले सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेले होते, त्यामुळे तेवढे मात्र वाचले. 




कुलपांच्या हव्यासामुळे घडलेले प्रसंग | कुलूप | Class ९ |







व्यायामाचे महत्त्व | Class 9 | अक्षरभारती | भावार्थ |

व्यायामाचे महत्त्व   कवी - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर  | अक्षरभारती | Class 9 |                                    ...